अपरिचित मराठवाडा । भाग : २



अपरिचित मराठवाडा । भाग : २


अप्पर सीटवर जागा मिळाली रुप्याचा MP3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली अन कधी सोलापूर आले कळलंच नाही. स्टेशनबाहेर असलेल्या प्रसिद्ध "अमृततुल्य" चा चहा पियालो. आज दसरा होता गडवाट परिवाराकडून परांडा किल्ल्यावर आज तोरण बांधले जाणार होते... जुना गडवाटकरी मित्र सुदर्शन हारफूले घेऊन हजर झाला बऱ्याच वर्षांनी गळाभेट झाली. दोन्ही गाड्या आल्या.. बॅगा ठेवून जागा पकडल्या.. तिथूनच पुढे एका उडप्याच्या हॉटेलात आमचा पोटभर नाश्ता झाला.


सुदर्शनला निरोप देताना काढलेला ग्रुप फोटो
सोलापूर येथील संभाजी महाराज चौकात सुदर्शनला निरोप दिला आणि भटक्यांच्या दसऱ्याला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली तशी पोर रानवारा पिऊन तरतरीत झाली होती. आमच्या गाडीत मी,मोठा अमर, सुबोध, रुपेश, सुरज, जयेश आणि किशोरअशी टीम होती तर बाकीची दुसऱ्या गाडीत. दोन्ही गाडीत धमाल मस्ती सुरु झाली. वैराग येथे दोन मित्रांची सोबत झाली आणि इथला फक्कड चहा झाला. आता पुढील लक्ष होते बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर.. सोलापूर ते बार्शी ७० किमी असे दीड तासाचे अंतर आहे. १०:३० वाजता आम्ही भगवंत मंदिरात पोचलो. विष्णूदेवाचे मनोभावे दर्शन झाले. इतिहास अभ्यासक मित्र राज जाधव यांची स्नेहभेट तसेच खास रे TV या युट्युब चॅनेलच्या टीमची खासम खास भेट झाली.

या मंदिराबद्दल मिळालेली माहिती अशी कि, भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. पुराणात इथे अंबरीश राजा राज्य करत असल्याचे उल्लेख इथे सापडतात. "दहा खंड पृथ्वी, अठरा खंड काशी, बार्शीत नांदतो अंबऋषी.." तसेच पुराणातील आणखी एक उल्लेख म्हणजे भगवान विष्णूच श्री भगवंत या अवतारातलं मंदिर फक्त बार्शीतच आहे इतर कुठेही नाही. पंढरपूरला जाऊन केलेला एकादशीचा उपवास बार्शीत येऊनच सोडावा लागतो असे येथील लोक मानतात. म्हणून बरीच भाविक लोक पंढरपूरच्या वारीनंतर बार्शीत येऊन द्वादशी दिवशी उपवास सोडतात.


भगवंत मंदिर 

भगवंत मंदिर 

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे कि. भगवंत देवाची मूर्ती हि शाळीग्राम च्या दगडात घडवलेली आहे. भगवंत देवाच्या पाठीमागे लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे जी सहसा लगेच नजरेत पाहता येत नाही. भाविकांना देवीचे दर्शन व्हावे म्हणून उजव्या बाजूस आरसा लावलेला आहे त्यामुळे आरशातूनच दर्शन घेता येते. मंदिरांच्या आतील बाजूस, गाभाऱ्यात बरीच अप्रतिम नक्षीकाम व विविध शिल्प आपणास पाहायला मिळतात. पुरातन दगडी बांधकाम केलेली मंदिराभोवतालची भिंत तसेच मंदिरातील लाकडी बांधकाम शैलीमुळे हे देवस्थळं लक्ष वेधून घेते व मन प्रसन्न करते. मंदिराच्या जवळ असलेली सुदर्शन विहीर आम्हाला काही कारणास्तव पाहता आली नाही. 

मंदीरात असलेले नागशिल्प

एक राजा महादेवाची पूजाअर्चा करतानाचे शिल्प

गणपती बाप्पा

खांबावर असलेलं हत्तीचं कोरीव शिल्प

समोर दिसतेय ती भगवंताची मूर्ती व आरशात दिसणारी लक्ष्मी देवीची मूर्ती

मुरली वाजवणारा कृष्ण, घागर घेतलेली गवळण व गाई

मंदिराबाहेरील सुंदर नक्षीकाम

भगवान विष्णूची शेषशायी मूर्ती

मंदिराबाहेरून काढलेलं छायाचित्र

कोरिव नक्षीकाम केलेले दगडी खांब
बार्शीतील या अप्रतिम मंदिरास व येथील मित्रांना निरोप देत आम्ही निघालो परांडयाकडे....

बार्शीतील या अप्रतिम मंदिरास व येथील मित्रांना निरोप देत आम्ही निघालो परांडयाकडे....  आबाच्या कुलदैवत असलेलं ठिकाण परांडा रस्त्यावर होत. रस्त्यावरच असणाऱ्या श्री क्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथ जोगेश्वरीचे दर्शन घेतले. मंदिर फार पुरातन असले तरी अलीकडे जीर्णोद्धार केला गेला असावा. मंदिरातील काळ्या पाषाणातील मूर्ती महाराष्ट्रातील सर्व "कुलदैवत"म्हणजेच खंडोबा, जोतिबा, सिदोबा, नाईकबा वैगेरेदेवांच्या साजेशी मिळतीजूळतीच अशी आहे. मंदिराबाहेर देवाचा पुरातन लाकडी रथ आहे. ज्याचा वापर अजूनही रथोत्सव दरम्यान होतो. वेळेचं नियोजन पाहता दर्शन घेऊन ताबडतोब तिथून निघालो आणि परांडा एसटी स्थानकासमोर गाड्या लावून किल्ल्याकडे मोर्चा वळवला. किल्ला अगदी गावाच्या मधोमध बांधला गेलेला आहे. १२:३० वाजले होते दुपारचे कडकडीत ऊन पडले होते अन त्यात अंगाची लाही लाही झाली होती. लगोलग फोटो काढत आम्ही सगळे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. चारही बाजूने भल्या मोठ्या खंदकाने हा किल्ला वेढलेला आहे.

या किल्ल्याबद्दल मी अभिजित बेल्हेकर यांच्या लेखातून वाचले होते. त्यामुळे या किल्ल्याचे माझ्या लेखी थोडेफार वर्णन व अभिजित सरांनी परांड्यावर लिहिलेल्या लेखाचे उतारे इथे देतो आहे.

मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेखपरमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही दुर्गनिर्मिती, ज्याला पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केले. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!
परांडा

किल्ल्याबाहेरील खंदक

राजहंसाची नक्षी असलेला दगड

मारगिरीच्या छिद्रातून डोकावणारी तोफ
कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. आत यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे), संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफा.. हे सारेच दृश्य एका बुलंद वास्तुची दहशत निर्माण करते. या दहशतीच्या छायेखालीच पुढे दुसऱ्या दरवाजाची कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराचीछोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी आहे. जणू हे पाणी पायांवर घेतच प्रवेश करायचा. या दरवाजाच्या लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. याचे वाचन झाले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही, पण बहुधा या परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख असणार! हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान महमद गवान याने. पुढे निजामशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या गडाने बराच काळ मुस्लीम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो. 

तटबंदीतुन चालताना संरक्षक पाकळी भिंती व त्यातून मारगिरीची छिद्रे

पंचधातूची तोफ

खंदक व आतील संरक्षक अभेद्य बुरुज

फांजी व त्याखाली असलेल्या सैनिकांच्या देवड्या

सैनिकांच्या देवड्या 

तोफेवर असलेल्या सिंहाचे शीर पळवून नेल आहे

ढालकाठी बुरुजावरील तोफ 

विरगळीचे दगडाचा वापर तटबंदीत केलेला दिसतो


पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम

पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम

डागडुजी केलेली तटबंदी व सावलीत निवांत बसलेले कामगार
हा सारा इतिहास लक्षात ठेवत आम्ही दुर्गदर्शनाला सुरुवात केली. आज दसरा असल्याने तिथल्या पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्याची परवानगी घेतली आणि दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावर तोरण बांधून आकाश ने गारद देऊन परिसर प्रफुल्लित केला आणि मन अधिक प्रसन्न झाले. किल्ल्यावर आम्हा १७ जनांशिवाय कोणीच नसल्याने किल्ला व्यवस्थित पाहता आला. सर्वात आधी तटबंदीच्या बेचक्यातून तटाबाहेरील मंहादेव मंदिराकडे गेलो जवळपास ४० ते ५० फूट उंच अशा तटबंदीच्या मधून आम्ही जात होतो. 

महादेव मंदिर
उत्तराभिमुख दरवाजा पाहून तटबंदीवर आलो आणि उजव्या बाजूला वळत महाकाय तोफा पाहत हवामहाल पाहून फांजीवरून खाली उतरलो व गणपती मंदिर पाहून या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीरकडे आलो. एका कमानीखालील भुयारी मार्गातूनच या विहिरीत आपण उतरतो. प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली आहे. या जिन्यांनी या मजल्यावर आलो, की अष्टकोनातील प्रत्येक भागातील कमानींच्या त्या रचनेतून विहिरींचे सौंदर्य निराळे भासू लागते. आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे. असे म्हणतात, या विहिरीचे पाणी हत्तीद्वारे उपसले जाई. कमानींची रचना, बांधकामातील जिने, खोल्या, गच्ची, गवाक्ष या साऱ्यांमुळे गुजरातमधील शिल्पजडित विहिरींची आठवण होते. विहीरीत बऱ्यापैकी पाणी असल्याने आम्हाला खाली उतरता आले नाही. गडाचा आतील भाग पाहून मग त्याच्या तटावर चढलो. परांडय़ाचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील त्या प्रचंड तोफांमध्ये! गडाला २६ बुरूज आणि या प्रत्येक बुरुजावर धडकी भरवणाऱ्या २६ मोठाल्या तोफा ! यातील सहा तर पंचधातूच्या, उर्वरित पोलादी! यांची नावेही दहशत बसवणारी- मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणीअझदहपैकर ऊर्फ सर्परूपलांडा कासमखडक अशी एकापेक्षा एक! निजामशाहीची शान असलेली ‘मलिका-ए-मैदान’ (जिचा आपण सारे ‘मुलूख-ए-मैदान’ असा चुकीचा उल्लेख करतो.) ही तोफ या गडावर काही काळ होती. इथून ती मुरार जगदेव याने आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. गडावरील या तोफांवर ती ओतणाऱ्या, घडवणाऱ्यांचे लेखही आहेत. दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावरील पंचधातूची तोफ अशीच बलदंड, आक्रमक! सारा बुरूज तिने व्यापलेला आहे, जिच्यावर तीन ठिकाणी लेख कोरलेले आहेत. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची सिंहांची एक जोडीही विसावलेली आहे. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या त्या अक्राळविक्राळ जबडय़ात तो तोफेचा गोळाही दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. यातील उत्तरेकडील बुरुजांवरील दोन अजस्र पोलादी तोफा पाहूनच दडपण यायला होते. त्यांचा आवाज, विध्वंस वृत्ती याची कल्पनाही करवत नाही. परांडय़ाचा हा बुलंद दुर्ग पाहताना त्याच्या या धडकी भरवणाऱ्या तोफा कायमच्याच लक्षात राहतात. परतीच्या वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी भरलेले एक कोठार होते. हे दारुकोठार सध्या वटवाघळांच्या राहण्याचे ठिकाण झाले आहे. प्रचंड कुबट वास. छोट्या उखळी तोफा आणि दारुगोळ्यांवर त्यांची विष्टा पडून पडून दुर्दशा तर झालीच आहे आणि उंदरांनी ठिकठिकाणी उकरल्याने बरेच तोफगोळे ढिगाखाली बुजत आहेत. याकडे तेथील पुरातत्व खात नक्कीच लक्ष देईल हि इच्छा..









परांडय़ातील या तोफा, तोफगोळे, हिंदू देवतांची शिल्पे, प्राचीन शिलालेख या साऱ्या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू आहेत. पण हा सारा ऐवज आज ऊन-वारा-पावसात धूळ खात पडून आहे. चोरा-लुटारूंचे त्याला भय आहे. यातील काही तोफांच्या कडय़ा, छोटेमोठे भाग कापून चोरल्याचेही दिसते. परांडय़ाच्या तटावरून फिरताना गडाच्या अन्य स्थापत्याकडेही लक्ष जाते. भल्या जाडजूड रुंदीच्या या तटावरून खालीवर करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. या गडाच्या प्रत्येक बुरुजापुढे अन्य एका बुरुजाचे चिलखत घातलेले आहे. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर लावलेली आहे. ही खास मुस्लीम स्थापत्यशैली. या तटावरून फिरत असतानाच त्याच्या लगतच्या खंदकाकडेही आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते. परांडय़ाला असा हा संपूर्ण किल्ल्याभोवतीने भला लांब-रुंद खंदक आहे. पण तिथे आज गावभराचे गटार सोडले आहे. उकिरडा आणि वेडय़ा बाभळीच्या झाडांचे जंगल माजलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पुरातत्व खात्याचं या किल्ल्यावर युद्धपातळीवर संवर्धन व नव्याने बांधकाम चालू आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही हा किल्ला सरस ठरेल.(काही भिंतीवर कोरलेली नावे सोडून) किल्ल्यावर सुरु असलेल्या कामामुळे ३६ खांब असलेले पूर्वीचे माणकेश्वर मंदिरम्हणजेच आताची मशीद आणि हमामखाण्यातील पुरातन मूर्ती व शिल्पे पाहता आली नाहीत. 

पुरातत्व विभागाच्या कामामुळे २ ठिकाणे सोडून संपूर्ण किल्ला पाहायला २ तास लागला. पोटात कावळे ओरडत होते आणि आजच्या जेवणाची उपासमार होणार हे पाहता आम्ही प्रत्येकी २ केळी खात आता पुढील किल्ल्याकडे मार्गस्थ झालो होतो.


साभार:- सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर


Friday, January 19, 2018

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणिविश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते.रुप्या आणि विश्रामला तशी कल्पना दिली कि राकेशयेतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटीराकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती.

नवीन वर्षाचा श्री गणेशा 
आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी (दीपकराकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची स्वारी वाईला निघाली. वाईच्या एसटी स्टॅन्ड जवळ गाडी पोचली तेव्हा घड्याळात सकाळचे ५:१० वाजले होते गाडीतुन पहिलं पाऊल बाहेर टाकताच थंडीचा जोर किती होता हे शब्दात सांगू शकत नाही. एसटी स्टॅन्डवर खादाडी आणि चहाचं इंधन भरून घेतलं. खावली गावची एसटीची चौकशी करून घेतली. एसटी सकाळी ६:०० ची होती तिथं पर्यंत आमचा दंगामस्ती चालूच होती ती इतकी कि सकाळचे ६ कधी वाजले हे कळलं सुद्धा नाही. गाडी ६:१५ला स्टॅन्डला लागली आणि एसटीचे ड्राइवर नसून साक्षात मायकल शुमाकर गाडी चालवत होते कि काय अशी पाल मनात चूकचुकली. भाऊनी सॉरी (मायकल शुमाकर भाऊंनी) अर्ध्या तासात म्हणजे सकाळी ६:४५ वाजता खावली गावात नेवून आम्हाला आपटलं. समोर पाहिलं तर एकापाठोपाठ एक तिरक्या-उभ्या रस्त्याची चढाई दिसत होती तसेच अजून थोडंवर टोपीधारी केंजळगड उजवी कडे आणि रायरेश्वर डावीकडे दिसत होते मागे कोळेश्वर पठाराचा पसारा दिसत होता. कोवळी किरणं नदीच्या रायरेश्वर खोऱ्यात झिरपू लागली आणि आमची पायगाडी चालू झाली.

खावली गावातून केंजळगड 

डांबरी रस्त्यावरील पहिल्याच दोन वळणानेच आमची दमछाक झाली. मग एकेठिकाणी डोंगराच्या सरळ सोडेंवरचा आड मार्ग पकडला आणि रायरेश्वर तसेच केंजळगडच्या डोंगराच्या सोंडेवर पोहचलो. इथे पोहचायलाच ८:३० झाले, समोर केंजळगडाकडची वाट धरून डोंगरधारेवरून चालू लागलो.

केंजळगडाकडची वाट


थोडी फोटोग्राफी आणि गडाच्या इतिहासाची चालत चालत चर्चा करत केंजळगडच्या कातळटप्याजवळ पोचलो. इथे प्रकरण थोडं गंभीर होत कारण सुकलेल गवत दवाने भिजून वाटेवर आले होते त्यावर पाय ठेवलारे ठेवला कि घसरायचा. तो टप्पा जीव मुठीत घेऊन पार केला. आणि केंजळगडाला डावीकडून ट्रॅव्हसी मारून गडाखालील गुहे जवळ आलो. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात.

गडाखालील गुहा 


गुहेत वटवाघळाची विष्ठा आणि रेलचेल चालू होती म्हणून तिथून काढता पाय घेतला. थोडं पुढे आम्हाला गडाच्या पायर्‍यांच्या सुरवातीला दोन्ही बाजूला देवडयांचे अवशेषदिसले आणि खाली कोर्ल्यातून येणारी वाट भेटली. आम्ही पुढे निघालो कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून पूर्वी दरवाजा होता हे सांगणारं जोते पाहिले मग चालू झाली आमची गडभ्रमंती, एव्हाना १०:२० वाजले होते त्यामुळे गडफेरी लवकरात लवकर आटोपती घेतली. 

कातळात खोदलेल्या पायऱ्या

गडावर पाहण्यासाठी एक प्रशस्त खोदलेले तळे आहे या तळ्याचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे तसेच काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आहे. एक सुकलेले टाकेतसेच काही इमारतींचे भग्नावशेष ही आढळतात.

खोदलेले तळे

इमारतींच्या वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चांगली मजबूत असे दारूचे कोठार पाहावयास मिळते. कोठारापासून दुसर्‍या दिशेने चालत गेलात कि आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दुसर्‍या चुन्याच्या घाण्यापुढे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेषआहेत तसेच इतरही काही मूर्ती आसपास आहेत. आम्ही गडावरुन खाली पायर्यांच्या इथे आलो थोडी खादाडी केली मोबाइलला रेंज आल्यामुळे घरी जिवंत असल्याची बातमी दिली. घड्याळात ११:०० झाले होते वाटलं आम्ही वेळेत आहोत तरीपण जास्त रिस्क न घेता केंजळगड आणि रायरेश्वर सोडेंवर आलो. तसेच पुढे चालत आम्ही रायरेश्वर आणि केंजळगडाच्या खिंडीतील रस्त्यावर आलो.

चुन्याचा घाणा

मंदिराचे अवशेष
इथे एका दुकानात चहाची ऑर्डर दिली तिथेच रायरेश्वरीलजंगम काकाशी भेट झाली त्यानी आमची रायरेश्वरवर जेवणाची सोय केली. खिंडीतून भर उन्हात रायरेश्वर चढताना पाय मागे ओढत होते. त्या कंटाळवाण्या रस्त्यावरून शेवटी एकदाचे रायरेश्वरच्या शिडी जवळ आलो. शिडी पार करून आम्ही रायरेश्वर वरील पठारावर आलो गावकर्यांनी पायवाट पेव्हरब्लॉगनी बांधून पार रायरेश्वर मंदिरापर्यंत केली आहे. वाटेत उजव्या हाताला एक विहीर होती तिथे थोडं फ्रेश झालो त्यानंतर पाच मिनिटावर एक पाण्याची टाकी दिसली ज्यामध्ये गोमुखातून पाणी पडत होते. असे म्हणतात कि हेपांडवकालीन गोमुख आहे. हेच पाणी गडावरील ४०/५० घरे पिण्यासाठी वापरतात. तसेच याचा उगम महादेव मंदिराच्या खालून झाला आहे.

शिडी
विहीर

इथून पुढे गेलो आणि रायरेश्वरचे मंदिर दिसले. मंदिरात प्रवेश केला त्यावेळी १२:१० वाजले होते. सर्व काही वेळेत होत होते. मंदिर बाहेरून बंद होते ते खोलण्यासाठी लहान मुलांना पुजारींना बोलवायला पाठवले. आम्ही जरा मंदिराच्या पडवीत विसावलो. राकेश आमच्यात नवीन होता पण त्याने कोणतीही तक्रार ना करता ट्रेक करत होता हे वैशिष्ट्य. थोड्याच वेळात मंदिराचे पुजारी आले त्यांनी दरवाजा खोलून आम्हाला आता प्रवेश दिला आणि रायरेश्वरवराची माहिती आणि इतिहास सांगितलं. शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर पण तसे निश्चित विधान मांडता येणार नाही मात्र ही घटना काल्पनिक आहे की खरी याबद्दल आजही प्रश्न निर्माण होतात. थोडावेळ मंदिराच्या कानाकोपऱ्यात फिरलो.


रायरेश्वरचे मंदिर

खूप छान वाटलं आम्हाला पुढे जायचं असल्यामुळे आम्ही जंगम काकाच्या घरी निघालो. तेथील जेवणतर अप्रतिम तर होतच पण जेवणानंतर ताकाची चव आजून हि जिभेवर आहे. थोड़ा वेळ आराम करून जंगम काकाच्या घरातून दुपारी १:०० वाजता कोळेश्वरसाठी कोणती वाट आहे का विचारल काकांनी त्यांच्या भावांना आम्हाला वाटेला लावायला सांगितलं. रायरेश्वरच्या पठारा वरून आम्ही पुढे निघालो काकांनी नाखिंडला जाणाऱ्या वाटेवरून मधेच डावीकडे वळले आणि आम्हाला निशाणीचा दरा या घाट वाटेला लावलं. आम्ही लवकरात लवकर खाली पोचण्याचा निर्णय घेतला होता. दादा आम्ही अर्धी वाट पार करेपर्यंत आम्हाला वरून पाहात होते किती त्या गावाकडील गड्याला काळजी. आम्ही नीट वाटेवर पोचल्यावर ते निघून गेले. रायरेश्वर वरून निघून अवघ्या ४० मिनिटात आम्ही जांभळी धरणाजवळील परातवाडीत पोचलो. मंदिरापाशी पाण्याच्या बाटली भरून घेतली आणि गावकर्यांन कडून कोळेश्वरला जाणाऱ्या वाटेचा अंदाज घेतला.

दरा घाट 
जांभळी धरण

गावातून जांभळी धरण पार केलं तेव्हा घड्याळात २:२० झाले होते. आम्ही सर्व वेळेत करत होतो आणि आज कोळेश्वर करून जोर गावात मुक्काम होणार म्हणून खुश झालो होतो. ह्याच आनंदात आम्ही धरणाच्या डावीकडून योग्य वाटेवर होतो. इतक्यात त्या वाटेला २ फाटे फुटले होते एक सरळ तर एक उजवीकडे. सरळ वाट जास्त मळलेली होती म्हणून आम्ही तिलाच धरून पुढे जाऊ लागलो आणि हीच चुकि आम्हाला भारी पडली. आम्ही अर्धे अधिक चढलो असताना वाट निमुळती होऊन गायब झाली. डावीकडे उजवीकडे पाहिलं थोडं मागे गेलो तरी वाट कुठे फिरली नव्हती. झालं आमच्या डोक्याची भज्जी झाली. पण वाट त्याच डोंगराच्या सोंडेवर आहे हे पक्कं होत उजवीकडच्या दिशेने गचपणातून आम्ही पुढे निघालो. माझं आणि रुप्याच मत एकच होतो आणि ते बरोबर होत पण विश्रामला ते मान्य नव्हतं आणि हा भाई मी डावीकडे वाट आहे का पाहायला गेला आणि आमच्या बाजूच्या सोडेंवर पोचला बिचारा राकेश मनातून एवढ्या शिव्या देत होता कि मी ऐकल्या असत्या तर माझ्या कानातून पार रक्तच आलं असतं. आता घड्याळातील पाती गरागरा फिरू लागली, वेळ झाली होती संध्याकाळी ४:३० माझा राग पार टोकाला गेला होता कारण विश्राम वाट शोधायला गेलेला अजून आला नव्हता त्यात वेळ निघून जात नव्हता. शेवटी या भाईने समोरच्या सोडेंवर या वाट भेटली. आता आमच्या इथून त्याच्या इथे जाणे म्हणजे दिव्यच कार्यक्रम तरी रुप्याने हार मानली नाही जो कारवीची झाडीत पिसाळलेला बैलासारखा घुसला ते पाहून मी तिथेच थक्क उभा राहिलो. रुपेश भाऊंचे किती आभार मानायचे हे मला कळत नव्हतं फक्त डोळयांतून अश्रू येण्याचे बाकी होते. शेवटी विश्राम जवळ पोचलो पाहतो तर काय वर जाणारी वाट नाही खाली जाणारी आहे. मग सर्वात शेवटी गावात जाऊन राहायचं आणि दुसऱ्या दिवशी वाटाड्या घेऊन निघायचा निर्णय घेण्यात आला. तशी वाटेने खाली येताना विश्राम आणि माझी प्रेमानी दिलेल्या शिव्यांची जुगलबंदी चालूच होती. रुप्या आणि राकेश आपण रेडिओ ऐकत आहोत असे चालत होते. शेवटी जवळील एका ओढ्यावर आलो फ्रेश झालो सर्वांचे कपडे खूपच घाण झाले होते. त्यात कुसळा आणि खाजेरी झाड़ लागून हाताला पायाला खाज येत होती. थोडा वेळ पाण्यात डुबकी मारून गावाकडे आलो तेव्हा घड्याळात ६ वाजले होते. आणि सूर्यास्त होत होता तशी अंगात थंडी शिरू पहात होती. विश्राम आणि रुप्याने गावात जेवणाची आणि मंदिरात झोपायची सोय केली होती. मी आळशी माणूस राकेशला घेऊन गावात आलो.


गावातील मंदिरात बॅग टाकून थोडं बसलो होतोच तेच मंदिराच्या बाजूच्या घरातील मामांनी घरात बोलावलं आणि लागलीच चहाचा कप समोर आला किती ते आदारतीर्थ. जेवणासाठी आमच्याकडेच या असा कटाक्ष मामांनी लागलीच टाकला आम्हीही नाहीहि बोलू शकलो नाही. संध्याकाळी ७ वाजले होते आम्ही सर्व मंदिराच्या बाहेर ओसरीतील पायऱ्यावर बसून गप्पा मारू लागलो. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या, त्या इतक्या कि कधी ८:४५ वाजले माहित पडलंहि नाही. मामांना सकाळी वाट दाखवण्यासाठी कोणी येईल का असा प्रश्न टाकला असता त्यांनी चोरगे मामा येतील उद्या सकाळी ६ वाजता आणि आमचा वाटाड्याचा मोठा प्रश्न मिटवला. लागलीच चोरगे मामांशी बोलणी करून जेवणासाठी मामांच्या घरी गेलो. मामींनी जेवण एकदम साधं पण खूपच छान बनवलं होत जेवताना इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्या. जेवण करून झाल्यावर मामांना मानधन देत होतो पण मामा काही मानधन घेत नव्हते. खरंच मनात अस विचार आला कि किती स्वच्छ आणि साध्या भोळ्या  मनाची मानस असतात हि गावातली तरी मामांना योग्य ते मानधन दिलंच आणि आम्ही मंदिरात परतलो आता थंडीचा जोर खूपच वाढला होता. आम्ही अंथरूण घालणार इतक्यात एक गावातील मामा मंदिरात आले आणि त्यांनी भजनासाठी वापरण्यात येणाऱ्या जाडजूड चादरी खाली पांघरण्यासाठी दिल्या खरंच खूप आदर वाटतो परातवाडीतील गावकऱ्यांचा किती माया त्याची आमच्यावर खरंच खूप भारावलो होतो, आम्ही चारही जण इतक्यात बाजूच्या घरातील मामांनी हाक दिली. आम्ही बाहेर आलोतर काय मस्त शेकोटी केली होती मामांनी. आम्ही मस्त शेक घेत होतो आणि आमच्या गप्पाचा फड परत एकदा चालू झाला. थोड्या वेळ गप्पा मारून  रुप्या आणि मी सुमडीत काढता पाय घेऊन मंदिरात झोपी गेलो. थोड्या वेळाने राकेश आणि विश्रामआले. चोरगे मामा सकाळी येणार होते त्यामुळे अंथरुणात पडलो तेव्हा लगेच झोप लागली. रात्री २ वाजता कानात येऊन वाघ ओरडला कि काय म्हणून थोडी जाग आली पाहतोतर काय राकेश कानात जोरात घोरत होता पण दिवसभराचे थकलेले असल्याने कसलं काय उठतोय तसाच परत झोपलो ते उठलो पार सकाळच्या थंडगार वाऱ्याच्या झुळकीने आता अंथरुन हि थंड पडलं होत उठलो आणि घड्याळात पहिले तर सकाळचे ५:४५ वाजले होते. रात्री वस्तीची एसटीचे ड्राइव्हर आणि कंडक्टर मंदिराच्या दुसऱ्या कोनात झोपले होते ते उठून बाहेर गेले आणि गावातून सकाळची ६ची एसटी वाईला जाते. ड्राइव्हरने गाडी स्टार्ट मारली आणि ती सकाळची शांतात भंग केली.



थोड्याच वेळात चोरगे मामा आले. आणि आम्ही फ्रेश होऊन तयार होणारच तेच मामांच्या घरातून गरमा गरम चहा समोर आला. मामांनी चोरगे मामांना सक्त ताकीद दिली होती. पोरांना वेळेत जोर गावात पोहोचवं. मामांच्या आदरतिर्थाने खरंच आम्ही भारावलो मामानं नमस्कार करून आम्ही तिथून निघालो आणि पुढील वेळी नक्की येऊ अस आश्वासन आम्ही सर्वानी दिले आणि चोरगे मामांन बरोबर चालू लागलो. जांभळी धरण पार करून आम्हाला जेथे दोन वाट लागलेल्या आणि जेथून आम्ही वाट चुकलो त्या फाट्यावर आलो. तेव्हा मामांना विचारलं कि सरळ जायचं ना तेव्हा मामा बोलले कि नाही उजवीकडे वळायचंच त्यावेळी आमचे चेहरे पाहून आम्हांलाच हसायला येत होत थोडं पुढे गेलं कि वाट डावीकडे वळते आणि सरळ सोडेंवर निघते. काल ज्या ठिकाणी आम्ही अडकलो होतो तेथून उजवीकडे गचपणातून हि वाट अवघ्या १०मिनिटावर होती म्हणजे काळ रुप्या आणि मी बरोबर होतो. वाटेवर मार्किंग तसेच भगव्या रंगाचे रिबीन झाडाच्या फ़ांदीला बांधलेले आढळले. वाट चांगली होती मनात वाटलं मामांना परत गावाकडे पाठवावे पण बोललो नको पुढे काय वाढून ठेवलंय कोणाला माहित शिवाय कालचा अर्धा दिवस असाच वाया गेला. त्या सरळसोट चढाई वर आमचा पार कस निघाला तरी नेटाने चढाई करत होतो. वाटेवर झाडी भरपूर असल्याने थोडी कमी दमच्याक होत होती. सर्वात पुढे मी माझ्या मागे राकेश त्यानंतर रुप्या शेवटला विश्रामआणि मामा. मामा कधी आमच्या पुढे किंवा कधी मागे असतं. गावातून निघून आता १:३० तास झाला होता. म्हणजे सकाळचे ८:१५ वाजले होते आम्ही ६:४५ ट्रेक चालू केला होता सर्व काही वेळेत होत. थोडा पुढे कोळेश्वरच्या खालील खुल्या जागेवर आलो. पुढे मी आणि राकेश  होतो बाकी तिघेही मागे असल्याने इथे थोडा आराम केला. थोड्याच वेळात सर्व आले आणि राकेशने आणलेल्या खजुरावर ताव मारला आणि आम्ही पुढे निघालो कोळेश्वरची शेवटची चढाई खूप त्रासदायक ठरली नाही. वाशिवाली आणि किरुंडे गावाची वाट डावीकडून येऊन मुख्य वाटेला भेटली. 

कोळेश्वरच्या पायऱ्या

अगदी ५ मिनिटात आम्ही कोळेश्वरच्या पायऱ्या जवळ येऊन उभे ठाकलो. पायऱ्या पार करून कोळेश्वरच्या विस्तीर्ण पठारावर आम्ही पाय ठेवले खरे पण समोरचा नजारा पाहून पाय निघता निघेना. शेवटी मामांनीच पुढाकार घेऊन तुम्हाला वेळेवर महाबळेश्वर पोहचायचं आहे ना असं बोलल्यावर भानावर आलो आणि धनगर वाड्यावर पोहचलो. थोडं पाणी पिऊन बाटल्या भरून कोळेश्वर मंदिरापाशी आलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. थोडी फोटोग्राफी करून कोळेश्वरवरून जोर गावाकडे जाणाऱ्या वाटेकडे वळलो.


धनगरवाडा 


कोळेश्वर 

कोळेश्वर पठाराच्या जंगलात गारवा मस्तच होता यावेळी चोरगे मामापुढे त्यांच्याबरोबर मी, मध्ये राकेश मागे विश्रामआणि रुपेश अशी पायगाडीच एंजिन भर जोरात धावत होत. इतक्यात आमच्या पायगाडीला जोरात ब्रेक लागला कारण मामा थोडे वाटेवरून चालताना आडवाटेला गेले आणि आपण वाट चुकलो आहोत असे त्यांच्या वेळीच लक्ष्यात आले. मग डावीकडे वाट शोधतांना करवंदीच्या झाडीतून कशीतरी वाट काढत मूळ वाटेवर आलो. आता चुकण्याचा संभव नव्हता कारण परत एकदा मार्किंग आणि रिबीन झाडाला बांधलेल्या वाटेवर आम्ही होतो. कोळेश्वर पठारावर रेंज आल्याने रुप्या आणि राकेशने घरी कॉल करून जिवंत असल्याची बातमी दिली आणि परत झाडीभरल्या जंगलात घुसलो. कोळेश्वर मंदिरापासून आतापर्यंत २० ते २५ मिनिटाच्या जंगल प्रवासामधून सह्याद्रीच्या धारेवर उभे राहिलो. समोर महाबळेश्वर दिसत होते तर डावीकडे कमळगडची हलकीशी झलक दिसत होती खाली जोर आणि जाधववाडी नांदगाणे गाव पहुडलेली होती. धोम बलकावडी धरणाचा अफाट पसारा डोळ्यात सामावून पुढे निघालो.



पुढची वाट लय बेक्कार त्यात चोरगे मामांनी जो टेप रेकॉर्ड चालू केला लवकर चला लवकर चला, आतापर्यंत धारेवर आलो तेव्हा १० वाजले होते. मनात वाटलं आता अर्ध्या तासात जोर गावात पण कसलं काय वाट लय बेक्कार सारखे पाय घसरत होते. फक्त कसातरी तोल सांभाळायचा अर्धी वाट पार केली आणि वाटेच्या मधल्या टप्यात आलो तेव्हा कुठे जीव शांत झाला. आता वाट पूर्ण झाडीमधून होती त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होणार होता. मी आणि चोरगे मामा एका ठिकाणी थोडा आराम करत बसलो सर्व एकत्र आलो आणि पुढील वाट चालू लागलो. मामांनी आमच्या सर्वंची खूप प्रशंसा केली. आजपर्यंत एवढे कमी वेळात तुम्ही लोकांनी हि चढाई उतराई पार केलात मामांशी बोलता बोलता आम्ही एक ओढा ओलांडून जोर गावात प्रवेश केला. गावातील दुकानात थोडं खाण्यासाठी घेतलं आणि पोटभर पाणी पिऊन मामांना निरोप दिला.


पुढील वाटेवर जात असताना महाबळेश्वरमध्ये काम करणारा एक मित्र भेटला. त्याने माझ्याबरोबर चला मी महाबळेश्वरला चाललोय तुम्हाला वाट दाखवतो मग काय आम्हाला बरंच झालं आम्ही त्याच्याबरोबर चालू लागलो. गावापासून पाचच मिनिटावर कुंभळजाई देवीचं मंदिरलागलं. देवीचं मंदिर बंद असल्याने बाहेरूनच हातजोडून नमस्कार केला आणि पुढील वाटेला लागलो आता सर्वाचीच इंजिन आवाज देवू लागली. त्या मित्राला वाट विचारून त्याला पुढे पाठवून दिले उगाच आमच्यापायी त्याला कामावर जायला लेट नको.


कुंभळजाई देवीचं मंदिर

आता महाबळेश्वरच्या गणेशदरा वाटेने आम्ही हळू हळू वर चढू लागलो. जोर गावातून गणेशदराच्या अर्ध्या वाटेवर आलो तेव्हा घड्याळात १२ वाजले होते आणि आमच्या चेहऱ्यावरही पोटात कावळे परत एकदा काव काव करत होते. त्यांना मॉन्जिनीसचा केक आणि बिस्कीट खायाला घालून शांत केलं आणि वाटेत थोडा टाइमपास करत गणेशदराच्या पायऱ्याजवळ आलो तेव्हा सर्व भलतेच खुश झाले थोडं पुढे वर आलो आणि विघ्नहरताचे गणपतीला हात जोडून मनोमन आभार मानले आणि पुढे महाबळेश्वरच्या बाजारीकरणाच्या गर्दीत आलो. मंदिराकडे न जाता आम्ही पहिले कृष्णाई मंदिरात आलो. 


गणपती मंदिर 

कृष्णाई मंदिर

तिथे परत एकदा खादाडी करून मंदिराजवळ फोटोग्राफी केली. कृष्णाई मंदिराजवळच्या स्ट्रॉबेरीच्या फार्म मधून थोडी स्ट्रॉबेरी मुंबईवासियासाठी घेतली आणि महाबळेश्वर मंदीरापाशी आलो. विश्राम बाहेर दुकानाजवळच थांबला आम्ही महाबळेश्वर मंदिरात दर्शन घेतले जेव्हा डोळे बंद केले तेव्हा रायरेश्वर कोळेश्वर डोळ्यासमोर आले. खरंच पार इतिहासात यांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का अशी पाल चुकचुकली. सर्व मंदिराचं दर्शन घेऊन गरमागरम नास्ता केला ते हि दुपारी ३ वाजता आता एसटी स्टॅन्डला जायला कोणतंही साधन नव्हतं कंटाळत पाय ओढत ऑर्थर सीट आणि जुन्या महाबळेश्वर फाट्यावर आलो एक वडापवाले थांबला होता. भाईच्या सीट भरायला ३:४५ वाजले होते. आम्हाला खूपच लेट होऊ लागलं होत कारण मुंबईमध्ये वेळेत हजर राहून सकाळी जॉबवर जायचं होत. वडापवाले काकांना थोडे जास्त पैसे घ्या पण लवकर महाबळेश्वर एसटी डेपोजवळ सोडा. तसे त्यांनी गाडीला लगेच स्टार्ट मारली आणि सुसाट गाडी महाबळेश्वर एसटी डेपो जवळ उभी केली. आता आमची घाई झाली सरळ मुंबई एसटी पकडायची कि सातारावरून जायचं. मधेच विश्राम भाऊ नि बॉम्ब टाकला मी साताऱ्याला घरी जाऊन उद्या येईन. मग काय सातारा एसटी स्टॅन्ड ला लागलीच होती. ती पकडली आणि बरोबर २ तासांनी म्हणजे संध्याकाळी ६ वाजता स्वराज्याच्या चौथ्या राजधानी मध्ये प्रवेश केला. आम्ही सर्वानी संदीप दादाना भेट देण्याचा प्लान केला आणि भेटलो हि, दादान सारखी मनमिळावू व्यक्ती भेटल्याने आनंद अजून व्दिगुणित झाला.

संदीप दादांसोबत 

दादा खास आम्हांला सोडण्यासाठी स्टॅन्डमध्ये आले. एसटीची चौकशी केल्यावर कळलं सर्व मुंबई जाणाऱ्या एसटी फुल्ल आहेत. मग काय लागलीच संदीप दादांनी सातारा हायवेसाठी रिक्षा करून दिली. रिक्षा पकडून हायवेला आलो खरं पण तिथे हि जत्राच होती. तब्बल १:३० तासाने म्हणजेच रात्री ८:४५ ला एका मारुती ओम्नीवाल्याने आमची दया आली वाकड ला सोडतो म्हणून गाडीत घेतले. भाईने जी काही गाडी पळवत होता अस वाटत होत कि पोलीस ह्याच्या मागे लागलेत. बरोबर १०:४५ ला वाकड गाठले आणि थंडीनेही आम्हाला गाठले. जी येईल त्या गाडीला हात दाखवत होतो पण गाड्या काही थांबायच्या नाहीत. शेवटी परेलची एसटी आली ४सीट खाली आहेत बोलल्यावर २ सेकेंड आम्ही गाडीच्या आत सीटवर, कंडक्टर पण आमच्याकडे पाहत राहिला. आता परत एकदा वाईचा मायकल शुमारक गाडी चालवत होता असा भास झाला आधीच गाडीचे सर्व पुर्जे ढिले होते त्यात हे भाई असं काही चालवत होता कि इंजिन फक्त बाहेर येण्याचा बाकी होता. पाठच्या एका बाईनेमध्येच त्याला शिव्या घातल्या खऱ्या पण भाईने कानाडोळा करून तेचा बदला त्याने घेतला. मध्यरात्री १:३०वाजता गाडीने दादरला आम्हा तिघांना फेकून पुढे निघून गेली आम्ही तिघे अर्ध्या झोपेतच दादर स्टेशन गाठलं नेहमी भरगच्च गर्दीने फुललेलं दादर स्टेशन शांत पडलं होत. आम्ही फलाट क्रमांक १ येऊन बसलो आणि सकाळी ४:३०वाजेपर्यंत गपागोष्टी करत होतो. आता स्टेशन मध्ये गर्दी चांगलीच जमु लागली ट्रेन हि आली ट्रेन मध्ये  प्रवेश केला खरं पण मन मात्र २ दिवस केलेल्या तंगडतोडीच्या गोष्टीची आठवण करून देत होता. राकेशबद्दल तर खूप गर्व वाटतो गड्याने काही तक्रार केली नव्हती. रुप्या तर आमचा ट्रेकचा आधारस्तंभ सर्वाना कसं हाताळायचं यांच्याकडून शिकावं आणि शेवट म्हणजे आमचे सर्वांचे लाडके बॅक लीडर विशू ह्या तिघंमुळे खरंतर ट्रेक जोरदार झाला. आता आम्ही काय चालायचं आणि चालत राहायचं बस.



साभार:- सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर

Comments

Popular posts from this blog

बहामनी साम्राज्याची स्थापना

हंसराज, स्वामी

बहमनी सत्तेचा उदय